महत्वाची घडामोड! धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला; आंदोलक संसदेबाहेर पोहोचले...

Foto
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एकीकडे नीट पेपर लीक आणि वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीचा चलो संसद मोर्चा संसदेच्या अगदी वेशीवर पोहोचला आहे, तर दुसरीकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे तातडीने गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आंदोलनाचा वाढता जोर आणि सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेता संसद भवनाचा मुख्य गेट बंद करण्यात आले असून दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड महत्त्वाची बैठक सुरू आहे.

अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांची तातडीची बैठक
सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आणि हजारो विद्यार्थ्यांनी संसदेकडे कूच केल्यानंतर संसद भवन आणि परिसर छावणीचे रूप धारण करून आहे. आंदोलक थेट संसदेच्या दिशेने निघाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून, या बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा होत असल्याचे समजते. आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधान हे राजीनामा देण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. 

 सीजेपीचे शिष्टमंडळ जे. पी. नड्डांच्या भेटीला
गृह मंत्रालयात तातडीच्या बैठका सुरू असतानाच, केंद्र सरकारने आंदोलकांशी चर्चेची तयारी दाखवली आहे.  चे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.  पेपर लीकप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा पद्धतीत सुधारणांची प्रमुख मागणी घेऊन हे शिष्टमंडळ नड्डा यांच्याशी चर्चा करणार आहे.

आंदोलक संसदेजवळ; पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर
जंतर-मंतरवरून निघालेला चलो संसद मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी संसद मार्ग, व्हीआयपी झोन आणि सेंट्रल विस्टा परिसरात कडक नाकाबंदी केली आहे. आंदोलकांनी काही ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांशी जोरदार चकमक झाली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी हलका लाठीचार्ज केला असून प्रेस क्लब ऑफ इंडियाजवळ अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या आहेत. सुरक्षेचे कारण देत दिल्लीतील राजीव चौक आणि पटेल चौक यांसारखी महत्त्वाची मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत.